वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवरील स्थगिती हटविली आहे. मंगळवारच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय पालटविला आहे. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती देणारा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने हटविला आहे. याचिकेवर न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि एस. व्यंकटनारायण भट्टी यांच्या खंडपीठाने सुनावणी केली आहे.
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला आंध्रप्रदेश एमेच्योर कुस्ती महासंघाकडून याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले हेते. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीवरील स्थगिती हटविली आहे. यामुळे कुस्ती महासंघाची निवडणूक आणि नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीनंतर कुस्तीपटूंचा वादही निकाली निघू शकतो. काही कुस्तीपटू जानेवारी महिन्यापासून कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना विरोध करत आहेत.
बृजभूषण यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी तपास सुरू आहे. तर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूने स्वत:ची तक्रार मागे घेतली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक चालू वर्षी होणार होती, परंतु अनेक वादांमुळे या निवडणुकीला विलंब होत राहिला आहे. बृजभूषण यांच्यावर अनेक आरोप झाल्यावर त्यांना महासंघाच्या कामकाजापासून वेगळे करण्यात आले आहे. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघाच्या समितीला कुस्ती महासंघाचे कामकाज हाताळण्याची आणि निवडणूक करविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.