10 किलो प्लास्टिकसह आठ हजार दंड वसूल
प्रतिनिधी /बेळगाव
प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत महापालिकेने प्लास्टिक जप्तीच्या कारवाईचा श्रीगणेशा मंगळवारपासून केला. विविध व्यापाऱयांकडील 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढे पुन्हा प्लास्टिकचा वापर किंवा विक्री केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे राबविण्याची सूचना केंद्रीय प्रदूषण मंडळाने केली आहे. त्यामुळे महापालिकेने जागृती मोहिमेसह कठोर कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. प्लास्टिक पिशव्या व साहित्याची विक्री करणाऱया व्यावसायिकांना लक्ष्य करून प्लास्टिक जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी बाजारपेठेत विशेष मोहीम राबवून दहा किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. त्याचप्रमाणे आठ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढेही कारवाई काटेकोरपणे राबवून फौजदारी खटलादेखील दाखल करण्याचा विचार महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने चालविला आहे. सातत्याने प्लास्टिक विक्री करताना सापडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.