भाजप प्रवक्त्याविरोधात काँग्रेस आक्रमक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील आताचे मीर जाफर आहेत. ते भारताचे युवराज आहेत, जे नवाब होण्यासाठी लंडनमध्ये विधानं करत आहेत. ब्रिटनमध्ये केलेल्या विधानांकरता त्यांना संसदेत माफी मागावीच लागणार असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
राहुल गांधी हे नेहमीच देशाला बदनाम करतात. राहुल यांनी देशाचा अपमान करत विदेशी शक्तींना देशात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. हा काँग्रेस आणि राहुल गांधींचा कट आहे. संसदेत सर्वात कमी भागीदारी असलेले राहुल गांधी हे आपल्याला बोलण्याची अनुमती दिली जात नसल्याचे म्हणत आहेत अशी उपरोधिक टीका पात्रा यांनी केली आहे.
मीर जाफरने नवाब होण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून मदत घेतली होती. आता राहुल देखील मीर जाफरप्रमाणे राजकारणात वागत आहेत. चर्चा हा लोकशाहीचा आत्मा आहे, परंतु राहुल गांधी यांनी 2019 पासून केवळ 6 वेळाच लोकसभेतील चर्चेत भाग घेतला आहे. चर्चेत सहभागी होणे टाळतात. खासदार असणे हे माझे दुर्दैव असल्याचे राहुल यांनीच मान्य केले आहे. काय बोलावे राहुल गांधी यांना माहित नसते. जयराम रमेश यांच्या मदतीने ते बोलत असतात असा आरोप भाजप प्रवक्त्याने केला आहे.
काँग्रेसकडून प्रत्युत्तर
भाजपच्या आरोपांना काँग्रेसने पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी माफी मागणार नाहीत हे शाह आणि शहंशाह देखील ओळखून आहेत. 9 वेळा नाक रगडून इंग्रजांची माफी मागणारे आणि व्हॉइसरॉयकडून पेन्शन मिळविणारे काँग्रेसला देशभक्तीचे धडे देत आहेत. सरकारवर टीका करणे म्हणजे देशाची बदनामी करणे नव्हे. लोकशाहीत जनता सर्वोपरि असते असे काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटले आहे.
लोकशाहीचे जयचंद होऊ नका
राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींच्या मित्रासंबंधी प्रश्न विचारत असल्याने हा ड्रामा होत आहे. राहुल गांधींनी पंतप्रधानांसमोर अदानींचा उल्लेख करू नये यासाठी हा खटाटोप सुरू आहे. भाजप नेत्यांनी लोकशाहीचा जयचंद ठरू नये. देशाऐवजी मित्राची चिंता केल्यास इतिहासात तुम्हाला जयचंद संबोधिले जाईल अशा शब्दांत खेडा यांनी भाजपला लक्ष्य केले. तर भाजप नेते पात्रा यांनी राहुल गांधी यांना मीर जाफर म्हटल्याप्रकरणी काँग्रेस त्यांच्या विरोधात कारवाई करू पाहत आहे. काँगेसशासित राज्यांमध्ये पात्रा यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्याची तयारी केली जात आहे.