अजित पैंगीणकर /काणकोण
गोवा पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. गोव्यातील कोणत्याच पक्षाचे सरकार 100 टक्के सरकारी नोकऱया देऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्या मतदारसंघात पर्यटन, कृषी, दुग्ध व्यवसाय अशा क्षेत्रांना चालना देण्याचा आपला प्रयत्न असेल. प्रदूषणविरहीत एखादी चांगली कंपनी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न असेल. रोजगाराच्या क्षेत्रात एक मास्टर प्लॅन तयार करण्याचे आपले लक्ष्य आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून काणकोण मतदारसंघातील सर्व पक्षांतील बुद्धिवादी लोकांना बरोबर घेऊन आणि सरकारी नोकरीत असताना चांगली सेवा देऊन ज्या व्यक्ती निवृत्त झालेल्या आहेत त्या लोकांचे सहकार्य घेऊन आपण व्हिजन काणकोण या संकल्पनेला वाव देणार आहे, असे काणकोणचे आमदार असलेले सभापती रमेश तवडकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
त्यासाठी कला, शिक्षण, रोजगार, कृषी, मत्स्योद्योग, वीज, पाणी, सहकार, वन, सीआरझेड, कचरा व्यवस्थापन, क्रीडा, मानव संसाधन, महिला सक्षमीकरण, आदिवासी कल्याण असे एकूण 18 विविध गट तयार करण्यात आलेले आहेत. या मतदारसंघातील क्रियाशील, जाणकार आणि अनुभवी व्यक्ती व्हिजन काणकोणसाठी वावरणार आहेत. उद्योग व्यवसायात जे उद्योजक भांडवल घालू शकतात अशा व्यक्तींची खास बैठक घेण्यासंबंधी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. या मतदारसंघात ऍग्रो, क्रॅब, प्राउन्स त्याचप्रमाणे फ्लोरी कल्चर आणि कल्चरल टुरिझमसारखे उद्योग कसे आणता येईल याचा विचार व्हिजन काणकोण ही संघटना यापुढे करणार आहे. या सर्व गोष्टी करताना या मतदारसंघातील शेवटची व्यक्ती देखील उपाशी राहणार नाही, ती सुखी-समाधानी कशी राहील याकडे लक्ष दिले जाईल. पुढील पाच वर्षांत काणकोण मतदारसंघाचा कायापालट झालेला पाहायला मिळणार, असे त्यांनी अगदी ठामपणे सांगितले.
काणकोणात आयआयटीसाठी प्रयत्न
सुदैवाने काणकोणात देवस्थान, कोमुनिदादीच्या जमिनी आहेत. आजवर या मतदारसंघातील विकासकामांसाठी या संस्थांनी जमिनी दिलेल्या आहेत. त्यामुळे एखादा चांगला प्रकल्प जर या ठिकाणी आणयचा असेल, तर जमिनीवाचून तो प्रकल्प अडणार नाही. यापूर्वी लोलये पंचायत क्षेत्रातील भगवती पठारावर होऊ घातलेला आयआयटीचा प्रकल्प चुकीच्या मार्गाने हाताळला म्हणून हातातून निसटला. जे लोक या प्रकल्पाला विरोध करत आलेले आहेत त्यांची बाजू समजून घ्यायला हवी होती. त्यांच्यात जे गैरसमज निर्माण झालेले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. तो झाला नाही. त्यामुळे काणकोण मतदारसंघात आयआयटी येणे हे आपले स्वप्न आहे आणि त्यासाठी बोलणी झालेली आहे. आयआयटी काणकोण मतदारसंघात आल्यास काणकोणच्या विकासात भर पडणार आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन या प्रश्नावर चर्चा केली जाणार असल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले.
काणकोण मतदारसंघात सध्या तरी पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. चापोली धरण असताना गावणे धरण उभारण्यात आलेले आहे. या धरणाचे काम पूर्ण झालेले आहे. पाण्याचे वितरण तेवढे बाकी आहे. येणाऱया काही दिवसांत या धरणातील पाण्याचे वितरण होणार आहे. त्याशिवाय करवण बंधारा बांधण्याचा विचार असून या तालुक्यातील पाणी समस्या लवकरच सुटणार आहे, असे त्यांनी सांगितले.
केरीवासियांच्या स्थलांतराची योजना
खोतीगाव पंचायत क्षेत्रातील नडकेच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. मार्ली आणि तिर्वाळ हे दोन्ही वाडे अभयारण्य कक्षेत येतात. अभयारण्य क्षेत्रात राहणाऱया लोकांना रस्ता मिळवून देण्यासाठी 10 हजार चौ. मी इतक्या जागेची सुविधा आहे. त्यातील 8 हजार चौ. मी. इतकी जागा मार्लीच्या रस्त्यासाठी वापरण्यात आलेली आहे. तिर्वाळच्या वाडय़ावर जाणाऱया रस्त्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी बोलणी चालू आहेत. केरी हा भाग उंच पठारावर आहे. या वाडय़ावर रस्ता तयार करणे अशक्य आहे. त्यामुळे वाडय़ावरील लोकांचे स्थलांतर करणे हा एकमेव पर्याय आहे आणि त्यादृष्टीने वाडय़ावरील युवकांशी बोलणी झालेली आहेत. कित्येक वर्षांपासून या वाडय़ावर हे लोक राहत आलेले आहेत. जीवनावश्यक सुविधांपासून हे लोक वंचित आहेत. तेथील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याच्यावर उपचार करणे अशक्य झालेले आहे. त्यांना सर्व सुविधा देऊन पुनर्वसन करणे सरकारला सहज शक्य आहे. त्यासाठी योग्य त्या जागेची पाहणी करण्याचे काम हातात घेण्यात आलेले आहे आणि आताचा युवक या गोष्टीला राजी झालेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोवा सरकारात पाच वर्षे आपण महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. काणकोणचे रवींद्र भवन, कृषी भवन, पैंगीणचे पोटके मैदान हे महत्त्वाचे प्रकल्प येणाऱया काळात पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल आणि सभापतीसारखे महत्त्वाचे पद आपल्याजवळ असल्यामुळे या गोष्टी अशक्य नाहीत. उलट दुप्पट क्षमतेने आपण आता कामाला लागलेलो आहे. आपली कोणतीच फाईल अडून राहणार नाही याची आपल्याला खात्री आहे, असे तवडकर म्हणाले.
बड्डे येथे श्रमसेवा धामची उभारणी
काणकोणच्या भाजप कार्यकर्त्यांनी बड्डे, खोतीगाव येथील एका व्यक्तीच्या घराच्या उभारणीचे काम हातात घेतले आहे. ज्या घराला माडाच्या झावळय़ांनी शाकारण्यात येत होते, घराला भिंतीच नव्हत्या अशा घराच्या उभारणीसाठी कोणी धन दिले, कोणी बांधकाम साहित्य दिले. कोणी श्रम दिले आणि 10 ते 12 लाख रु. खर्च करून घराची उभारणी करण्यात आली आहे. म्हणून या घराचे नाव देखील श्रमसेवा धाम असे देण्यात आलेले असून 18 जून रोजी या घराचा वास्तुप्रवेश होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काणकोण मतदारसंघातील नागरिकांना सरकारच्या सर्व योजना कशा मिळतील आणि या मतदारसंघातील अपूर्णावस्थेत असलेले प्रकल्प पूर्ण करण्याकडे आपले लक्ष असेल, असे तवडकर यांनी सांगितले.
सभापतीपदाला योग्य न्याय देण्यास कटिबद्ध
मुळातच आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे आलेली व्यक्ती आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख केडरमधील व्यक्ती आहे. केंद्रीय नेतृ
त्वाकडे आपला जवळचा संबंध आहे. एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी आपल्याजवळ आहे आणि मुख्यमंत्र्यांनंतर सभापतीपदाकडे अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून पाहिले जाते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आपण ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि या पदाला योग्य तो न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, असे तवडकर यांनी स्पष्ट केले. सभापती हा केवळ विधानसभेपुरताच मर्यादित नसून 365 दिवस तो जनतेसाठी उपलब्ध कसा असू शकतो हे आपल्याला दाखवायचे आहे. हे करताना केवळ काणकोणपुरतेच न पाहता गोव्यातील सर्व मतदारसंघांना योग्य तो न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल. पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयाचे शारीरिक शिक्षक म्हणून शिक्षकी पेशात उतरल्यानंतर आज उच्च सभापतीपद सांभाळत असताना आपल्याला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले.