प्रतिनिधी /बेळगाव
जीएसएस कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक शिबिराची रविवारी सांगता झाली. येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे एनएसएस संयोजनाधिकारी डॉ. बी. एस. नावी तर अध्यक्षस्थानी जीएसएस कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. भरत तोपिनकट्टी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनाधिकारी प्रा. पी. एस. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. प्रा. नावी यांनी शिबिर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांची व गावकऱयांची प्रशंसा केली.
या शिबिरात श्रमदानाबरोबरच व्याख्याने, ग्रामस्वच्छता, तलाव स्वच्छता, अभियान, ग्राम पंचायत हद्दीतील घरांचा सर्व्हे, प्लास्टिक हटाव मोहीम, जनजागृती रॅली, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. सर्व विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रा. भरत तोपिनकट्टी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.