आचरा प्रतिनिधी
पंचमुखी महादेवांच्या पालखीस हजारो भाविकांची उपस्थिती
Conclusion of Ramnavami festival in Acharya
येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता रविवारी पहाटे लळीताने झाली. यावेळी पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत बसवून मंदिराभोवती हर हर महादेवच्या जयघोषात सोमसूत्री प्रदक्षिणा करण्यात आली. आतषबाजी व लोफेच्या सलामीने सुरू झालेल्या पालखीला हजारो भाविक उपस्थित होते. देवस्थानच्या रामनवमी उत्सव सांगता सोहळ्यात शाही थाटातील पंचमुखी महादेवाची पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली
उत्सवाच्या लळिताला वर्षातून एकदाच पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत विराजमान करून रामेश्वर मंदिरास सोमसूत्री प्रदक्षिणा घालण्यात येते. या पालखी सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते. बाल कलाकारांसह तरुण, ज्येष्ठांनीही तलवारबाजी, लाठीकाठी प्रात्यक्षिके सादर करीत रंगत आणली. पालखी नंतर उत्सवाच्या सांगतेचे कीर्तन रंगले. पहाटे कीर्तन आटोपल्यानंतर श्रींच्या पंचारतीबरोबर रघुपतीच्या दहा आरत्या एकाचवेळी बाहेर पडत श्री देव रामेश्वरच्या मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आल्या. कीर्तनाची सांगता झाल्यावर सर्व उपस्थित भक्तगणांना श्रींचा प्रसाद म्हणून श्रीफळ वाटण्यात आले. पूर्ण उत्सव पार उत्सव सुरक्षीत पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा, आचरा ठाण्याचे पोलीस, ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.