प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी जुलै अखेरीस होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, मंत्री एम. एस. बोसराजू आणि तिप्पण्णप्पा कमकनूर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजप व निजदतर्फे कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे शेट्टर यांच्यास काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे.
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आर. शंकर आणि बाबूराव चिंचनसूर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. तिन्ही जागांसाठी काँग्रेसने सोमवारी उमेदवार जाहीर केले होते. या तिघांचे उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक अधिकारी तथा विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांच्याकडे दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते. बुधवार 21 जून रोजी अर्ज छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्यासाठी 23 जून शेवटचा दिवस आहे.