मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी गोकाक येथील वाल्मिकी मैदानावर मंगळवारी प्रजाध्वनी-2, काँग्रेस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात येत असलेल्या कामांची महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी पाहणी केली. जिल्ह्यातील बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री व इतर नेतेमंडळी येत आहेत. गोकाक व अरभावी मतदारसंघातील जवळपास 20 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, जिल्ह्यातील आमदार, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत, असे गोकाक येथील काँग्रेस नेते महांतेश कडाडी यांनी सांगितले. यावेळी सिद्धलिंग दळवाई, अशोक पुजारी, यल्लाप्पा पुजारी, गंगाधर बडकुंद्री, सी. सी. कोन्नूर उपस्थित होते.