तीन सत्रात झालेल्या बहारदार कार्यक्रमात कलाकारांची कलात्मक पेशकश
बेळगाव : संगीत कलाकार संघाच्या वार्षिकोत्सवाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात रविवार दि. 28 रोजी सकाळी 10.30 वाजता अनिमिष हेगडे यांच्या शास्त्राrय गायनाने झाली. त्यांनी ‘मियाकी तोडी’ या रागात विलंबित तीनतालात बडा ख्याल सादर केला. सुंदर आलापी आणि स्पष्ट स्वरोच्चारित तानप्रकार गाऊन त्यांनी रागाची चांगली बढत केली. द्रुत एकतालामधील बंदिशसुद्धा आकर्षक तानक्रियेने त्यांनी सजविली. अनिमिष यांनी त्यानंतर देवगंधार रागामध्ये तीनतालात एक आकर्षक बंदीश सादर केली. शेवटी ‘सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी’ हा अभंग गाऊन त्यांनी आपला कार्यक्रम संपविला. त्यांना तबला साथ संतोष पुरी आणि संवादिनी साथ योगेश रामदास यांनी केली. या सत्राचे दुसरे पुष्प गुंफले आकाश पंडित यांनी. सुरेल आणि घराणेदार गायकीचे उत्तम संस्कार प्राप्त झालेल्या आकाश यांनी राग ‘अल्हैया बिलावल’मध्ये तिलवाडा तालात विलंबित आणि द्रुत तीनताल व एकतालात छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर बसंतमुखारी रागामध्ये एक बंदीश सादर केली. शेवटी ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’ हा अभंग गाऊन आकाश यांनी आपले गायन संपविले. त्यांना तबल्यावर अंगद देसाई आणि संवादिनीवर योगेश रामदास यांनी अतिशय सुंदर साथ केली. सुरुवातीला ज्येष्ठ तबला वादक पं. कल्याणराव देशपांडे, वकील श्रीवत्स हेगडे, अध्यक्ष नंदन हेर्लेकर, सेक्रेटरी प्रभाकर शहापूरकर आणि खजिनदार दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कल्याणराव देशपांडे, सेक्रेटरी प्रभाकर शहापूरकर आणि नंदन हेर्लेकर यांनी कलाकारांना पुष्प देऊन सन्मानित केले. रोहिणी गणपुले यांनी सभासंचालन केले. अखेरच्या सत्राची सुरुवात रायबागचे सुप्रसिद्ध तबला वादक पं. कल्याणराव देशपांडे यांनी केली. गत पिढीतील महान उस्ताद पंडितांकडून विद्या मिळविलेल्या देशपांडे यांनी पारंपरिक पेशकार, आमद कलात्मकपणे पेश केल्यानंतर कायदे, मध्यलयीतील बंदिशी तयारीने वाजविल्या. द्रुत लयीमधले त्यांचे पढंतसहित केलेले वादन नवकलाकारांसाठी आदर्शवत असेच होते. योगेश रामदास यांनी त्यांना उत्कृष्ट नगमासंगत केली. उभय कलाकारांना ज्येष्ठ सतारवादक संजय देशपांडे यांनी सन्मानित केले. वार्षिकोत्सवाचे अखेरचे पुष्प गुंफले ज्येष्ठ गायक पं. राजप्रभू धोत्रे यांनी. त्यांनी अतिशय बहारीने मारुबिहाग या रागामध्ये विलंबित आणि द्रुत ख्याल पेश केला. त्यांच्या गायनातली लयकारीयुक्त सरगम आणि कठीण तानक्रिया ऐकून श्रोत्यांनी वाहवा केली. त्यानंतर त्यांनी गायलेला मिश्र रागातील ‘जादू भरे नयना रसिली’ हा दादरा रंगतदार होता. भजन संगीतात नावाजलेल्या राजप्रभू यांनी ‘जागा हो तुम्ही जागा’ आणि त्यानंतर भैरवीमध्ये ‘देवा सखा पांडुरंग’ हे अभंग प्रस्तुत करून संगीत कलाकार संघाच्या वार्षिकोत्सवाची सांगता केली. कलाकारांचा परिचय रोहिणी कुलकर्णी यांनी तर प्रभाकर शहापूरकर यांनी आभार मानले.