परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण
हिंडलगा/वार्ताहर
हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या विजयनगर येथील 60 फुटी रामघाट रस्ता काँक्रिटीकरण दरम्यान परिसरातील काही रहिवासी व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. त्यानंतर दाखल झालेल्या बुडा आयुक्तांनी रहिवाशांच्या शंकांचे निरसन केल्याने रस्ता कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून विजयनगर येथून जाणाऱ्या रामघाट रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले होते. परिसरातील काही रहिवाशांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने अनेकदा रस्त्याच्या विकासकामात अडथळे निर्माण झाले होते. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, राहुल उरणकर, डी. बी. पाटील, गजानन बांदेकर, रामचंद्र कुद्रेमानीकर, विठ्ठल देसाई, दीपा मिरजकर, अलका कित्तूर, चेतना अगसगेकर, रेणुका भातकांडे आदींनी प्रयत्न केल्याने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून शनिवारी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यादरम्यान परिसरातील काही रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या रहिवाशांनी रस्त्याच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी रहिवासी व सदस्यांमध्ये वादावादीचा प्रसंग घडला. त्यामुळे लागलीच बुडा आयुक्त व कॅम्प पोलीस निरीक्षकांना पाचारण करून रहिवाशांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली. पण वादावादीमुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक वर्षानंतर रस्त्याचा विकास होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.