महसूल मंत्र्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांना टोला
प्रतिनिधी /बेळगाव
महसूल असू दे किंवा कोणत्याही विभागामध्ये जर अधिक टेबलवर फाईल जात असेल तर त्या ठिकाणी अधिक भ्रष्टाचार होत असतो. त्यामुळे टेबल कमी करण्याकडे सरकारने अधिक लक्ष दिले आहे. टेबल कमी झाले तरच भ्रष्टाचार कमी होवू शकतो, असे म्हणत महसूल मंत्री आर. अशोक यांनी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चांगलाच टोला विधान परिषदमध्ये लगावला आहे.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महसूल विभागामध्ये कोणतेही काम असेल तर त्याला अधिक उशीर लागतोच. मात्र भ्रष्टाचारही अधिक होतो. तेव्हा त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी विधान परिषदेत केली. त्यावर महसूल मंत्री आर. अशोक यांनी भ्रष्टाचार होतो हे साऱ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यावर निर्बंध घालणे तसेच अवघडच आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
कोणतेही महसूल कार्यालय असू दे. त्यामधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच आम्ही
ऑनलाईनच्या माध्यमातून विविध योजना राबवत आहे. जेणे करून शेतकरी व सर्वसामान्य जनतेला कार्यालयात जावे लागणार नाही. महसूल विभागाचे काम सुरळीत आणि सरळ करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे, असे सांगितले. यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ईलेव्हनी असू दे ईस्केल, फोडी, पिटीसीट सारखी कागदपत्रे मिळविण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. याचबरोबर ती वेळेत दिली जात नाहीत, असा आरोप केला. त्यावर ऑनलाईनच्या माध्यमातून ही सर्व कामे सुरळीतपणे सुरू झाल्यास निश्चितच भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे त्यांनी सांगितले.
कोणतीही सरकारी इमारत विकू शकतात
उपनोंदणी कार्यालयामध्ये अनेक बेकायदेशीर खरेदी-विक्रीची कामे केली जात आहेत. कुणाचीही मालमत्ता दुसऱ्याला विकल्याचे प्रकार घडले आहेत. यापुढेही घडणार आहेत. त्यामुळे सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यावेळी उदाहरण देताना तिप्पेस्वामी म्हणाले, खासगी तर सोडा सरकारी इमारतही हे अधिकारी विकू शकतात, असे सांगितले. यावर साऱ्यांनीच त्याला होकार दिला. सर्व्हे करणारे कर्मचारी चुकीचा सर्व्हे करुन सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.