पुणे : समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असं भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराजांविरोधात पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड परिसरातील सनसिटी भागात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कालिचरण महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कालिचरण महाराजांनी भडकाऊ भाषण करत समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे खुटवड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. खुटवड यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी भाषणाची चित्रफित पाहून कालिचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग (वय 48) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक कादबाने अधिक तपास करत आहेत.