ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मला सत्तेची हाव नाही, असे अजित पवार सांगतात. हे खरे असेल तर त्यांनी आमदारांना गोळा करून आपल्या काकांचा पक्ष का फोडला? जो पक्ष काकांनी स्थापन केला, त्याच काकांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून का हाकलले? आता सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे की, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सत्तेची हाव नसल्याचे हे लक्षण अजिबात नाही. अजित पवार प्रामाणिक असते तर त्यांनी काकांच्या पक्षावर डल्ला मारला नसता, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार गटावर टीकास्त्र डागण्यात आले आहे.
अजित पवार यांना सत्तेची हाव नसती तर त्यांनी सरळ राजकारणातून संन्यास घेऊन कृषी, सामाजिक कार्यात झोकून दिले असते. पण काकांच्या पक्षावर डल्ला मारुन अजित पवारांना सर्व आयते मिळाले. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपने जे अचाट, पण बुळेगिरीचे काम करून घेतले तेच काम अजित पवारांकडून करून घेतले. मुळात शिवसेना ही जशी मिंधे गटाची नाही, तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार गटाचा नाही.
कपाटात गेलेल्या फाईल पुन्हा टेबलावर येतील
जे आमदार आपल्या गटात नाहीत, त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही, अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करत आहेत. सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी, इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले, ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपच्या गोठय़ात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, 2024 मध्ये नक्कीच सत्ताबदल होईल. कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील.