Kolhapur News : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन जवळून व्हावे अशी भाविकांची इच्छा असते. मात्र कोरोना काळानंतर खबरदारी म्हणून अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता सर्वांना गाभाऱ्याच्या चांदीच्या उंबरठ्याजवळून
दर्शन घेता येणार आहे. याबाबत आजच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भक्तांना गाभाऱ्यातून दर्शन घ्य़ावे असा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील अनेकांच्या दिवसाची सुरुवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊनच होते. नोकरदार असो किंवा व्यावसायिक आपापल्या कामावर जाण्यापूर्वी ही मंडळी दर्शनासाठी आवर्जून येतात. शहरातील जुन्या पेठांतील अनेक गृहिणी महिला दुपारी दर्शनासाठी येतात, तर अनेक ज्येष्ठ मंडळी सायंकाळनंतर देवीच्या दर्शनासाठी येऊन काही काळ मंदिराच्या आवारात विसावा घेतात.प्रत्येकाच्या रोजच्या वेळापत्रकातील मंदिरात येण्याच्या ठरलेल्या वेळा वेगवेगळ्या असताता. पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे आज पासूनच भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे.