नितीश राणा, सामनावीर रिंकू सिंग यांची अर्धशतके, सुनील नरेन, चक्रवर्तीचे प्रत्येकी दोन बळी
वृत्तसंस्था/ चेन्नई
आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने यजमान चेन्नई सुपर किंग्जचा 9 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी पराभव केला. कोलकाता संघातर्फे कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी शानदार अर्धशतके झळकविली. या सामन्यानंतर चेन्नईचा 13 सामन्यातून 15 गुणासह दुसऱ्या स्थानावर कायम असून कोलकाता नाईट रायडर्सने 12 गुणासह सातवे स्थान मिळवले आहे.
चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 145 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताच्या अचूक गोलंदाजीसमोर चेन्नईने 20 षटकात 6 बाद 144 धावा जमविल्या. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने 18.3 षटकात 4 बाद 147 धावा जमवत विजय नोंदवला.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे पहिले तीन फलंदाज केवळ 33 धावात तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी चौथ्या गड्यासाठी नोंदवलेल्या 99 धावांच्या भागीदारीच्या जोरावर कोलकाता संघाने हा सामना सहा गड्यांनी जिंकला. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दीपक चहरने गुरबाजला एका धावेवर झेलबाद केले. त्यानंतर दीपक चहरने तिसऱ्या षटकात वेंकटेश अय्यरला जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 4 चेंडूत 2 चौकारासह 9 धावा जमवल्या. चहरने सलामीच्या जेसन रॉयला डावातील पाचव्या षटकात तंबूचा रस्ता दाखवला. रॉयने 15 चेंडूत 1 चौकारासह 12 धावा जमवल्या. कोलकाता संघाने पॉवरप्लेच्या 6 षटकात 46 धावा जमवताना तीन गडी गमावले. कोलकाताचे पहिले अर्धशतक 43 चेंडूत नोंदवले गेले तर राणा आणि रिंकू सिंग यांची अर्धशतकी भागीदारी 44 चेंडूत फलकावर लागली. कोलकाता संघाचे शतक 83 चेंडूत नोंदवले गेले. रिंकू सिंगने 39 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले तर नितीश राणाने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 44 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 57 धावा झळकवल्या. रिंकू सिंग डावातील 18 व्या षटकात मोईन अलीच्या अचूक फेकीवर धावचित झाला. त्याने 43 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 54 धावा जमवल्या. रसेल आणि राणा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रसेल दोन धावावर नाबाद राहिला. कोलकाता संघाला अवांतराच्या रुपात 12 धावा मिळाल्या, त्यामध्ये 10 वाईड आणि एक नोबॉलचा समावेश आहे. चेन्नईतर्फे दीपक चहर यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 27 धावात 3 गडी बाद केले. कोलकाता संघाच्या डावामध्ये 4 षटकार आणि 13 चौकार नोंदवले गेले.
सुनील, वरुण प्रभावी
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर तसेच वैभव अरोरा यांच्या अचूक गोलंदाजीसमोर चेन्नईच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. गायकवाड आणि कॉनवे या सलामीच्या जोडीने 21 चेंडूत 31 धावा जमविल्या. डावातील चौथ्या षटकात गायकवाड वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 13 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. गायकवाड बाद झाल्यानंतर कॉनवे आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 33 चेंडूत 30 धावांची भर घातली. चेन्नईने पॉवरप्लेच्या 6 षटकात 52 धावा जमविताना 1 गडी गमाविला. चेन्नईचे पहिले अर्धशतक 31 चेंडूत फलकावर लागले. वरुण चक्रवर्तीने रहाणेला झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. शार्दुल ठाकूरने कॉनवेला सिंगकरवी झेलबाद केले. त्याने 28 चेंडूत 3 चौकारांसह 30 धावा जमविल्या. सुनील नरेनच्या फिरकीवर अंबाती रायुडूचा 4 धावांवर त्रिफळा उडाला तर सुनील नरेनने आपल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोईन अलीला एका अप्रतिम चेंडूवर 1 धावेवर त्रिफळाचीत केले. चेन्नईची यावेळी स्थिती 11 षटकात 5 बाद 72 अशी होती.
अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे या जोडीने संघाचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी 8.4 षटकात 68 धावांची भागिदारी केल्याने चेन्नईला 144 धावांपर्यंत मजल मारता आली. डावातील शेवटच्या षटकात अरोराने जडेजाला वरुणकरवी झेलबाद केले. त्याने 24 चेंडूत 1 षटकारासह 20 धावा जमविल्या. कर्णधार धोनी डावातील 2 चेंडू बाकी असताना मैदानात आला. त्याने 3 चेंडूत नाबाद 2 धावा जमविल्या. शिवम दुबेने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 34 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 48 धावा जमविल्या. चेन्नईला अवांतराच्या रुपात 6 धावा मिळाल्या. त्यामध्ये 4 वाईड आणि 2 नो बॉलचा समावेश आहे. चेन्नईच्या डावामध्ये 5 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. कोलकाता नाईट रायडर्सतर्फे सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 तर वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यापूर्वी दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 12 सामन्यातून 15 गुण घेतले आहेत. तर कोलकाता संघ 10 गुणासह शेवटून तिसऱ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक – चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकात 6 बाद 144 (गायकवाड 13 चेंडूत 17, कॉनवे 28 चेंडूत 30, रहाणे 11 चेंडूत 16, रायुडू 4, शिवम दुबे 34 चेंडूत नाबाद 48, मोईन अली 1, जडेजा 24 चेंडूत 20, धोनी नाबाद 2, अवांतर 6, चक्रवर्ती 2-36, सुनील नरेन 2-15, अरोरा 1-30, शार्दुल ठाकूर 1-15). कोलकाता नाईट रायडर्स 18.3 षटकात 4 बाद 147 (जेसन रॉय 15 चेंडूत 12, गुरबाज 1, वेंकटेश अय्यर 9, नितीश राणा 44 चेंडूत नाबाद 57, रिंकू सिंगू 43 चेंडूत 54, रसेल नाबाद 2, अवांतर 12, दीपक चहर 3-27).