पुणे / प्रतिनिधी :
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद कोथरूड शाखेतर्फे पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेते क्षितीज दाते व ऋचा आपटे-दाते यांच्या हस्ते बुधवारी कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ उभारण्यात आली.
अ.भा. भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेचे अध्यक्ष व संयोजक सुनील महाजन, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, पिंपरी-चिंचवड नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, तळेगाव-दाभाडे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, नाट्य व्यवस्थापक समीर हम्पी आणि सत्यजित धांडेकर, नाट्यगृहांचे व्यवस्थापक विजय शिंदे, बालरंग भूमीचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांच्यासह अनेक नामवंत कलावंत, बॅक स्टेज आर्टिस्ट, नाट्यगृहांशी संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
गेली १० वर्षे हा उपक्रम सुरू आहे. या वेळी बोलताना क्षितिज दाते म्हणाले, दरवर्षी नवीन नाटकांची गुढी यानिमित्त उभारली जाते. कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ ही महाराष्ट्रात केवळ पुण्यातच उभारली जाते, हे विशेष आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देऊन नेहमीच मदत केली जाते व यापुढेही केली जाईल. पुण्याची शान असणारे बालगंधर्व रंगमंदिरदेखील लवकरच नव्या व आकर्षक स्वरूपात रसिक प्रेक्षकांसमोर येईल, असे माजी महापौर मुरलीधर मोहोळ सांगितले.