विभागीय टेटे स्पर्धा : बालिका आदर्श, गोमटेश उपविजेते
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव शहर मान्यताप्राप्त जी. जी. चिटणीस व रजपूत बंधू स्कूल आयोजित प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धेत प्राथमिक गटात केएलएस प्लेझन्ट कॉन्वेंटचा तर मुलींमध्ये डी. पी. ने बालिका आदर्शचा पराभव करून तर माध्यमिक गटात केएलएसने गोमटेशचा तर डी. पी. बालिका आदर्श विद्यालयाचा पराभव करून दुहेरी मुकुट पटकाविला. बालिका आदर्श विद्यालयाच्या टेबल टेनिस सभागृहात आयोजित प्राथमिक व माध्यमिक टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालिका आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ओ. डोनकरी, रजपूत बंधूचे मुख्याध्यापक आर. वाय. माकन्नावर, कुरबेट, जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, देवकुमार मंगनाकर, संतोष दळवी आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते टेबल टेनिसला पुष्पहार घालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
प्राथमिक गटातील पहिला मुलींचा अंतिम सामना डी. पी. व बालिका आदर्श यांच्यात झाला. या सामन्यात डी. पी. ने 2-0 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलांच्या अंतिम सामन्यात केएलएस संघाने प्लेझेन्ट कॉन्वेंट संघाचा 2-0 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. माध्यमिक गटात मुलांच्या अंतिम सामन्यात केएलएसने गोमटेशचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बालिका आदर्शने केएलएसचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात डी. पी. स्कूल संघाने बालिका आदर्शचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विजेते संघ तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.