वार्ताहर /सांबरा
सांबरा येथे दुर्गामाता दौडीची बुधवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. दौड निघणाऱया मार्गावर स्वराज्य सेनेने ठेवलेल्या तब्बल दीडशे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती दौडीतील खास आकर्षण ठरल्या होत्या.
दौडीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन लक्ष्मण तिप्पाणाचे यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन दौलत जोई यांनी केले. कृष्णा जोई यांनी चौथरा पूजन केले. दीपक जोई यांनी शिवज्योतीचे पूजन केले तर तानाजी इरोजी यांनी श्रीफळ वाढविले त्यानंतर प्रेरणा मंत्राने दौडीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी दौडी समोरील भगव्या ध्वजाचे पूजन सागर जोगाणी यांनी केले. दौड जाणाऱया मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या तर भव्य स्वागत कमाणीही तयार करण्यात आल्या होत्या. दौड मेन रोड बसवाना मंदिर महादेव नगर मार्गे महात्मा फुले गल्ली ,मारुती मंदिर (अड्डा ),मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली ,भैरू देव मंदिर ,विठ्ठल रखूमाई मंदिर ,कलमेश्वर मंदिर, चावडी गल्ली ,शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ मार्गे दौड पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडीची सांगता करण्यात आली. दौडीमध्ये भगवा ध्वज धरण्याचा मान सुनील हरजी यांना मिळाला तर आदित्य जोई ,स्वागत पाटील,रोहित चिंगळी ,संतोष पाटील व सौरभ देसाई हे शस्त्राचे मानकरी ठरले. दौडीत हजारोहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.