ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 आणि 25 एप्रिल रोजी कोची दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वीच मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून, पत्र पाठविणाऱ्याने 24 एप्रिलला मोदींच्या दौऱ्यादरम्यान आत्मघातकी हल्ला करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. या धमकीनंतर केरळमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
केरळ पोलिसांना हे धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रावर पाठवणाऱ्याचे नाव आणि पत्ता होता. त्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधिताची चौकशी केली. मात्र, त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले. मला हे प्रकरण माहिती नसून, दुसऱ्या कोणीतरी माझ्या नावाने हे पत्र लिहिले असावे, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी केरळमध्ये हायअलर्ट जारी केला. बसस्थानक, रेल्वे स्थानके आणि विमानतळांवर तपासणी वाढविण्यात आली आहे.