24 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर ः इंधन अन् ऊर्जेच्या किमतींमुळे दिलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
घाऊक महागाई दरात जानेवारीमध्ये घसरण दिसून आली आहे. मंगळवारी जारी आकडेवारीनुसार घाऊक महागाई दर कमी होत 4.73 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात हा दर 4.95 टक्के इतका होता. तर मागील वर्षी जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दर 13.68 टक्के इतका अधिक होता. घाऊक महागाई दराचे हे प्रमाण 24 महिन्यांमधील नीचांकी ठरले आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये हा दर 4.83 टक्के राहिला होता.
कच्चे तेल, रसायने, रासायनिक उत्पादने, टेक्सटाइल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत घट झाल्याने घाऊक महागाई दरात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर केंद्र सरकारने सोमवारी किरकोळ महागाई दर जारी केला होता. जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून 6.52 टक्क्यांवर पोहोचला होता. हे प्रमाण तीन महिन्यांमधील उच्चांकी ठरले होते.
अन्नधान्याचा घाऊक महागाई दर 0.65 टक्क्यांनी वाढून 2.95 टक्के झाला आहे. तर भाज्यांचा महागाई दर उणे 35.95 टक्क्यांवरून उणे 26.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. अंडी, मांस आणि माशांचा महागाई दर 3.34 टक्क्यांवरून कमी होत 2.23 टक्के झाला आहे. कांद्याचा महागाई दर उणे 25.97 टक्क्यांवरून वाढत उणे 25.20 टक्क्यांवर गेला आहे. इंधन आणि ऊर्जेचा घाऊक महागाई दर 18.09 टक्क्यांवरून कमी होत 15.15 टक्के राहिला आहे.
घाऊक महागाईचा सर्वसामान्यांवरील प्रभाव
घाऊक महागाई दर दीर्घकाळापर्यंत अधिक राहणे हा चिंतेचा विषय असतो. घाऊक महागाई दर प्रामुख्याने उत्पादक क्षेत्राला प्रभावित करतो. घाऊक महागाई दर दीर्घकाळ अधिक राहिल्यास उत्पादकांकडून याचा भार ग्राहकांवर टाकला जातो. सरकार केवळ कराच्या माध्यमातून घाऊक महागाई दराला नियंत्रित करू शकते. कच्चे तेल महागल्यावर सरकार इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करत घाऊक महागाई दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता. परंतु सरकार एका मर्यादेपर्यंतच करकपात करू शकते. घाऊक महागाई निर्देशांकात धातू, रसायने, प्लास्टिक, रबर यासारख्या कारखान्यांशी निगडित सामग्रीच्या दरांचा विचार केला जात असतो.