खानापूर : सिंडिकेट बँकेची जुनी शाखा बेळगाव-गोवा रस्त्यावरील कॅनरा बँकेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचा फलक सिंडिकेट बँकेसमोर लावण्यात आल्याने ग्राहकांत खळबळ उडाली आहे. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेली जुनी सिंडिकेट (कॅनरा) बँक घोडे गल्लीतील वागळे यांच्या इमारतीतील सिंडिकेट बँक स्थलांतरित करू नये, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.
शहरात 40 वर्षापूर्वी स्टेशनरोडवरील वागळे यांच्या इमारतीत सिंडिकेट बँक सुरू करण्यात आली होती. या ठिकाणी बँकेचा व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या बँकेत खेड्यातील तसेच शहरातील अनेक ग्राहक आहेत. यात महिला संघ तसेच इतर व्यावसायिक, वृद्धाप पेन्शन, निवृत्ती पेन्शन यासह इतर शासकीय योजनांचे आणि शेतकऱ्यांचे व्यवहार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे या बँकेत कायम ग्राहकांची सोय होते. अलीकडच्या काळात राष्ट्रीय बँकांचे विलिनीकरण झाले आहे. यात सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे सिंडिकेट बँक आता कॅनरा बँक झाल्याने शहराच्या मध्यवस्तीत असलेली बँक बेळगाव-गोवा रस्त्यावर असलेल्या कॅनरा बँकेत हलवण्यात येणार आहे. या ठिकाणी कॅनरा बँकेत दोन्ही बँकेच्या ग्राहकांमुळे मोठी गर्दी होणार असून ग्राहकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच कॅनरा बँक पहिल्या मजल्यावर असल्याने वृद्ध लोकांना याचा त्रास सोसावा लागणार आहे.
अगोदरच कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ग्राहकांना बराच वेळ ताटकळत उभे रहावे लागते. जर दोन्ही बँकांच्या व्यवहार एकत्र सुरू झाल्यास ग्राहकांची मोठी गर्दी होणार असून त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. जर बँक बेळगाव-गोवा रस्त्यावर स्थलांतरित झाल्यास सर्वांना त्रासदायकच होणार आहे. त्यामुळे सिंडिकेट बँक आहे त्याच जुन्या ठिकाणी कायम ठेवण्याची मागणी होत आहे.