केंद्रीय विद्यापीठाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा गोंधळ
पाटणा / वृत्तसंस्था
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना शनिवारी बिहार दौऱयादरम्यान पाटणा कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शनांना सामोरे जावे लागले. केंद्रीय विद्यापीठाच्या मागणीसाठी डाव्या विद्यार्थी संघटना आणि एनएसयूआयने आंदोलन केले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱया विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ‘गो बॅक’च्या घोषणा सुरू ठेवल्याने पोलिसांनी लाठीमार करून निदर्शकांना पांगवले. या मुद्दय़ावर बोलताना विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या रितसर मार्गांनी सांगितल्यास त्याचे निराकरण करता येते असे नड्डा म्हणाले. मी घोषणाबाजी करणाऱया विद्यार्थ्यांना समस्या विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण नड्डा यांनी दिले आहे.
जे. पी. नड्डा हे पाटणा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या सन्मानार्थ येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, डाव्या विद्यार्थी संघटना आणि एनएसयूआयशी संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठ म्हणून घोषित करावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा संयुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाटण्यात आले आहेत. या बैठकीला रविवारी गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या सातही मोर्चांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पाटणा येथे होत आहे. यामध्ये सर्व आघाडय़ांचे राष्ट्रीय पदाधिकारी, राज्य संघातील सर्व आघाडीचे पदाधिकारी व इतर संबंधित सदस्य सहभागी होणार आहेत. या कार्यकारिणीचा प्रारंभ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने होईल, तर समारोपाच्या सत्रात पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष कार्यकर्त्यांना जनतेशी जोडण्यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने पक्षसंघटना मजबूत करण्याची भाजपची रणनीती म्हणून याकडे पाहिले जात आहे.
भव्य रोड शोचे आयोजन
जे. पी. नड्डा यांनी शनिवारी पाटणा उच्च न्यायालय ते गांधी मैदान असा रोड शो केला. यावेळी पक्षाचे मोठे नेते दोन रथांवर स्वार झाले होते. या रोडशोला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल, उपमुख्यमंत्री तारकेश्वर प्रसाद, रेणू देवी, रविशंकर प्रसाद, ऋतुराज सिन्हा रथावर उपस्थित आहेत. दुसऱया रथावर मंगल पांडे, राधामोहन सिंग, नित्यानंद राय यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. नड्डा यांच्या स्वागतासाठी संपूर्ण पाटणा पोस्टर बॅनरने झाकोळले होते. पाटणा विमानतळापासून गांधी मैदानापर्यंत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे, पोस्टर बॅनरने रस्ता व्यापला आहे. अनेक ठिकाणी स्वागतासाठी कमानीचे दरवाजे बांधण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी नड्डा यांच्या ताफ्याचे स्वागत करण्यासाठी व्यासपीठही उभारण्यात आले होते.
ग्राम संसदेचे उद्घाटन
पाटणा येथे ग्राम संसदेचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सबका साथ, सबका विकास आणि सर्वांचे प्रयत्न सोबत ठेवून काम केले आहे. मोदी सरकार पंचायत स्तरावरील विकासाच्या योजना एकाच व्यासपीठावर आणत आहे. पोर्टलवर 2.62 लाख पंचायतींच्या योजना आणल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.