वृत्तसंस्था/ मुंबई
2022-23 क्रिकेट हंगामासाठी मुंबईच्या वरिष्ठ क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदारकडे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये अमोल मुझुमदारकडे वरिष्ठ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यापुढेही सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट सुधारणा समितीचे अध्यक्ष जतीन परांजपे यांनी मुंबईच्या विविध वयोगटातील संघांसाठी प्रशिक्षक निश्चित केले आहेत. मुंबईच्या वरिष्ठ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार, 23 आणि 25 वर्षे वयोगटातील मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदी अमिताभ वेलसकर, 16 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी संदीप दहाड, 14 वर्षाखालील वयोगटाच्या संघाच्या प्रशिक्षकपदी दिनेश लाड, वरिष्ठ महिला संघाच्या प्रशिक्षकपदी संदेश कावळे, 19 वर्षाखालील मुंबई महिला संघाच्या प्रशिक्षकपदी अजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2021-22 क्रिकेट हंगामासाठी अमोल मुझुमदारची पहिल्यांदाच मुंबईच्या वरिष्ठ संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण बलाढय़ मुंबई संघाला गेल्या वर्षी टी-20 मुस्ताक अली करंडक आणि विजय हजारे वनडे करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर गेल्या वर्षी मुंबई रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अंतिम सामन्यात मध्यप्रदेशने मुंबईचा 6 गडय़ांनी पराभव करून रणजी करंडक पटकाविला होता. प्रशिक्षक राजेश पवारच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या 25 वर्षाखालील संघाने कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. त्याचप्रमाणे अमित वेलासकरच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या 19 वर्षाखालील संघाने कुच बिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.