जनता मेटाकुटीला, तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
बिम्स्मधील बॉईज हॉस्टेलचे डेनेज पाणी उघडय़ावरच सोडण्यात येत आहे. त्यामुळे सदाशिवनगर परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर इतर कचराही उघडय़ावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने डेनेजची समस्या तसेच उघडय़ावर टाकण्यात येणारे घाण पाणी व कचरा थांबवावा, अशी मागणी सदाशिवनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बिम्सची उभारणी करताना डेनेजची समस्या मात्र सोडविण्यात आली नाही. या समस्येमुळे साऱयांनाच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदाशिवनगर परिसरात असलेल्या संरक्षण भिंतीला लागूनच अनेक घरे आहेत. त्या परिसरात हे पाणी सोडले जात आहे. उघडय़ावर मैला टाकल्यामुळे अक्षरशः त्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
डेनेजची ही समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा या परिसरात रास्तारोको करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. बिम्सच्या वैद्यकीय संचालकांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, याचबरोबर जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱयांनी ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.