ग्रामपंचायत-प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पुढाकार : नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
येळ्ळूर : आता पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे डेंग्युसह इतर साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येळ्ळूर ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने येळ्ळूर गावामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. मागीलवर्षी डेंग्युच्या आजारामुळे अनेकजण त्रस्त झाले होते. त्यामुळे आताच ग्राम पंचायतीने याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच राष्ट्रीय डेंग्यू प्रतिबंधक दिवस आचरण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर येळ्ळूरमध्ये मोहीम राबविण्यात आली. डेंग्यू, मलेरिया हे आजार पावसाळ्यामध्ये अधिक प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. या आजारांविषयी जनतेला अधिक माहिती नसते. त्यामुळे अनेकजण या आजाराने त्रस्त होतात. त्यामुळेच ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांनी जागृती फेरी काढून जनतेला माहिती दिली. डासांपासून प्रत्येकाने संरक्षण करून घेणे महत्त्वाचे आहे. हे दोन्ही आजार डासांपासूनच होत असतात. त्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याचा साठा करू नये. साठविले तरी पुन्हा ते पाणी वापरात आणून दुसरे पाणी त्यामध्ये भरावे. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधक औषधांचा देखील वापर करावा, घराच्या परिसरातील झाडे, झुडपे काढावीत, गटारी स्वच्छ ठेवाव्यात, पाणी साठू नये याची काळजी घ्यावी, अशी माहिती घरोघरी जाऊन देण्यात आली आहे.