म. ए. समिती दक्षिण विभागाच्या बैठकीत निर्णय : यंदाही भव्य सायकल फेरीचे आयोजन
बेळगाव : भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर अन्यायाने बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये काळा दिन पाळून निषेध फेरी काढण्यात येते. या निषेधफेरीसाठी विभागवार, प्रत्येक गावांमध्ये जागृती करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समिती, दक्षिण विभागाच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य रणजित चव्हाण-पाटील होते. बेळगावमध्ये मराठी भाषिकांचे प्राबल्य असतानाही हा संपूर्ण प्रदेश कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून आजतागायत मराठी भाषिक निषेधफेरी काढून आपला निषेध व्यक्त करत आहेत. यावर्षीही भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी आतापासूनच विभागवार जागृती करावी. गल्लोगल्ली, गावोगावी बैठका घ्याव्यात. बैठकींना आम्हाला बोलवा, आम्ही हजर राहू असे म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर यांनी सांगितले. बैठकीला सागर पाटील, बाळू केरवाडकर, राजेंद्र बिर्जे, गुणवंत पाटील, प्रशांत भातकांडे, सतीश पाटील, दुर्गाप्रसाद जोशी, उमेश पाटील, जयशील मुरकुटे, अभिजित पुजारी, कपिल भोसले, मोहन पाटील, सुनील बोकडे, भावेश बिर्जे, भरत नागरोळी, महादेव पाटील यासह इतर सदस्य उपस्थित होते.