वारणानगर / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील डोंगरवाडी फाटा ता. वाळवा येथे कार व मोटरसायकल च्या झालेल्या अपघातात कोडोली ता. पन्हाळा येथील पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे.
अपघातामध्ये पती बाळासो महादेव केकरे वय ६३ यांचे उपचारादरम्यान कोल्हापूर येथे निधन झाले आहे. तर पत्नी भारती बाळासो केकरे वय ५३ या गंभीर जखमी असून त्यांचेवर कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताबाबत कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,डोंगरवाडी फाटा येथे व्हॅगनार कार करंजवडे कडून ठाणापुडे च्या दिशेने जात होती. त्याचवेळी मोटरसायकल डोंगरवाडी वरून चिकुर्डे या दिशेने चालली होती. बरोबर डोंगरवाडी फाटा येथील चौकात व्हॅगनार कार ने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघातातील केकरे पती-पत्नी डोंगरवाडी येथे मुलगी व नातवांना भेटण्यासाठी गेले होते. व्हॅगनार कार चालक सर्जेराव यशवंत पाटील रा.सातवे ता. पन्हाळा यांच्यावर गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगीतले तपास सहा. फौजदार महादेव खोत करीत आहेत.