नागरिकांचे ग्रा. पं., जिल्हाधिकारी, जि. पं. सीईओंना निवेदन
वार्ताहर /धामणे
धामणे ग्रामपंचायतीने गावात हुकुमशाही चालविली असून नागरिकांच्या विरोधाला घाबरून स्मशानभूमीतील सर्व्हे नं. 515 या जागेवर कोर्टाची केव्हिट घेऊन ग्रामपंचायत इमारत बांधण्याचा बेत आखला आहे.
धामणे ग्रामपंचायतीची इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारत बांधण्यासाठी गावच्या स्मशानभूमीच्या 515 सर्व्हे नंबरमधील जागेत इमारत बांधण्याला संपूर्ण गावकऱयांचा विरोध आहे. यासाठी ग्रामपंचायतीला जाब विचारण्याचे ठरले होते. परंतु ग्रामपंचायतने सदर जागेवर न्यायालयात केव्हिट घेतले असल्याने मोर्चाला पोलीस स्थानकातून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सोमवारी नागरिकांनी पीडीओ व ग्रामपंचायत अध्यक्षांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी हिरेमठ व जिल्हा पंचायत सीईओ यांनाही निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, धामणे गावातील ग्रामपंचायत इमारत स्मशानभूमीत न बांधता मोडकळीस आलेली जुनी इमारत काढून त्याच ठिकाणी नवीन बांधावी. जुन्या ठिकाणची ग्रामपंचायत इमारत सर्व नागरिकांना सोयीस्कर आहे. जिल्हाधिकाऱयांनी निवेदन स्वीकारून सीईओंना याची तातडीने चौकशी करायला लावून हे काम बंद करायला सांगू, असे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत माजी सदस्य विजय बाळेकुंद्री, माजी सदस्य नितीन पाटील, शिवप्रति÷ान धामणे विभागप्रमुख महेश पाटील, ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष यल्लाप्पा रेमाणाचे, दशरथ येळ्ळूरकर, परसु चौगुले, केदारी बाळेकुंद्री, संभाजी पाटील, दत्ता होणुले आदी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.