ओटीटीवर करणार पदार्पण
ओटीटीच्या जगतात बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांसह नवोदितांनाही स्वतःचे अभिनय कौशल्य दाखवून देण्याची संधी मिळाली आहे. सैफ अली खानपासून शाहिद कपूरपर्यंत अनेक स्टार्सनी ओटीटीच्या जगतात पाऊल ठेवले आहे. आता 87 वर्षीय बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र ओटीटीच्या जगतात पदार्पण करणार आहेत.
धर्मेंद्र हे झी5 ची वेबसीरिज ‘ताज-डिवायडेड बाय ब्लड’मध्ये दिसून येणार आहेत. ही सीरिज एक पीरियड ड्रामा असून यात मुघल साम्राज्याशी निगडित घटना दर्शविण्यात येणार आहेत. या सीरिजध्ये अदिति राव हैदरी ही अनारकली, तर आशिम गुलाटी हा सलीमच्या भूमिकेत असणार आहे. ताहा शाह, जरीना वहाब, संध्या मृदुल, राहुल बोस हे कलाकार देखील यात झळकणार आहेत. झी5 च्या या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सूफी संत शेख सलीम चिश्ती यांची भूमिका साकारणार आहेत.
‘ताज डिवायडेड बाय ब्लड’मधील स्वतःचे दोन वेगवेगळे लुक्स धर्मेंद्र यांनी शेअर केले आहेत. या सीरिजमध्ये मी शेख सलीम चिश्मी यांची भूमिका साकारत आहे. माझी छोटी परंतु महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे असे धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. फतेहपूर सिकरीमध्ये सूफी संत शेख सलीम चिश्ती यांच्या नावाने मकबरा तयार करण्यात आला होता. या सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह हे अकबराच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन रोनाल्ड स्कॅल्पेलो करत असून याची कहाणी सायमन फँटाजो यांनी लिहिली आहे.