दिवसभर जोरदार वृष्टी. सर्वत्र पाणीच पाणी
डिचोली / प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काल शुक्रवारी बराच जोर धरला सकाळपासून जोरदारपणे सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत सुरूच होता. मध्यंतरी अल्पशी विश्रांती घेत लोकांना बाहेर मोकळेपणाने फिरण्यास संधी दिली. अन्यथा दिवसभर जोरदार वृष्टी करीत डिचोली तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत करून टाकले.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला पाऊस सर्वांना सुख देत आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतीच्या कामाला वेग चढला आहे. रोप लागवडीची लगबग सुरू आहे. सर्वत्र शेतकरी शेतांमध्ये दिसत आहेत. काल दिवसभर पाऊस पडतच राहिल्याने काही खालच्या भागांमध्ये पाणी भरल्याचे दिसून येत होते. डिचोली व साखळीतील वाळवंटी नदीतील पाण्याची पातळी किंचीत वाढली होती. मात्र त्यात चिंता करण्यासारखे काही नव्हते.
जोरदार पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. नगरपालिका तसेच पंचायतींतर्फे मोन्सूनपूर्व कामे करण्यात आलेली आहेत. तरीही काही भागांमध्ये पाणी साचून राहते. त्याचा त्रास लोकांना होतो. काही गटरांमध्ये माती व कचारा तुंबल्याने पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर माती व कचरा दिसत आहे. डिचोली बाजारातील नवीन बाजार प्रकल्पाजवळील रस्त्यावर पावसामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी भरले होते. या भागातील गटरामध्ये कचरा साचल्याने पाण्याचा निचरा बंद झाला होता. त्यामुळे या भागात पाणी बराचवेळ तुंबून राहिले होते. नंतर डिचोली नगरपालिकेच्या कामगारांंनी सदर गटरातील कचरा साफ केल्याने पाण्याचा निचरा झाला व सर्व पाणी उतरले.
पावसाळा तसेच मोन्सून अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर पावसाला तसा समाधानकारक जोर नव्हता. मात्र आता पावसाने बराच जोर धरला आहे. त्यामुळे लोक सुखावले आहे. पावसाळा सुरू होऊनही पाऊस नियमित नसल्याने उकाडा सुरूच होता. पण जोरदारपणे पावसाचा मारा सुरूच असल्याने वातावरण थंड झाले आहे. त्यामुळे लोकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला आहे.
काल शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे पावसामुळे चोडण येथे एका घरावर झाड पडल्याने किरकोळ नुकसानी झाल्याची घटना घडली. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी धाव घेऊन झाड हटविले. याव्यतिरिक्त तालुक्मयात झाडांची पडझड होण्याच्या घटना नोंद झाल्या नाही.