वाहन चालकांची तारांबळ : हरवळेत घर कोसळून नुकसान
प्रतिनिधी / सांखळी
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आज गुरुवारी दिवसभर पावसाने सांखळी मतदारसंघात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने नगरपालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यावर पाणी साचून रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहन चालकांना बरीच कसरत करावी लागली. विद्यमान नगरसेवकांचे समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांसह नागरिकातून होत आहे. संबंधित अधिकाऱयांनी याची दखल घेऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.
हरवळेत घर कोसळून मोठी हानी
सांखळी मतदारसंघात हरवळे पंचायत क्षेत्रात जोराच्या पावसात शांताराम मानकर यांचे राहते घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. हरवळे ग्रामपंचायत सचिव प्रजनांद नाईक बोरकर, तलाठी नेहा चोडणकर, सरपंच राजू मळीक आणि इतर पंचायत सदस्यांनी जाऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त घर मालकाला तत्काळ पन्नास हजार रुपयांची मदत केली.
होंडा-फेंडा रस्त्यावर पावसाचे पाणी
सांखळी मतदारसंघात आज दिवसभर जोराचा पाऊस पडल्याने होंडा-फोंडा रस्त्यावर काही ठिकाणी गटारे न उपसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहन चालकांना बरीच तारेवरची कसरत करावी लागली. होंडा, सोनशी, डिंगणे, बाये, वेळगे, पाळी, इत्यादी ठिकाणी पावसाचे पाणी साचत असून संबंधित अधिकाऱयांनी पाहणी करून सदर समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.