प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील प्रतिष्ठेचा दिलीप सरदेसाई क्रीडा पुरस्कार योग्य उमेदवार न मिळाल्याने रद्द करण्याची पाळी क्रीडा-युवा व्यवहार खात्यावर आली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनी मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी त्याचे आयोजन करण्यात आले होते. आता तो कार्यक्रम होणार नाही, असे खात्यातील सूत्रांनी सांगितले.
राज्याचे क्रीडा सचिव, क्रीडा संचालक व इतर सदस्य असलेल्या सरदेसाई पुरस्कार समितीची बैठक झाली. पुरस्कारासाठी एकूण तीनजणांचे अर्ज आले होते. त्यावर चर्चा करण्यात आली. पुरस्काराचे निकष पूर्ण करणारा त्यात एकही उमेदवार नव्हता. त्यामुळे तीनही अर्ज फेटाळण्यात आले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या तिघांचे अर्ज आले होते त्यांची कामगिरी पुरस्काराला साजेशी नव्हती. त्यांचा फक्त त्या क्रीडा स्पर्धेत सहभाग होता. परंतु त्यांनी पदके मिळवलेली नाहीत. तसेच कोणतीही चमक वा प्रभावी कामगिरी केल्याची नोंद नाही. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत भाग घेतला म्हणून हा पुरस्कार देता येत नाही. शेवटी समितीने हा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्ती आवश्यक आहे, असे मत समितीने नोंदवले आहे. गोव्याचे सुपुत्र दिलीप सरदेसाई यांच्या स्मृतिनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचाच विचार होतो. यंदा तसा उमेदवार नसल्यामुळे हा पुरस्कार कोणालाच देता येणे शक्य नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. पाच वर्षांपूर्वी या पुरस्काराचे शेवटचे वितरण झाले होते. महिला क्रिकेट खेळाडू शिखा पांडे हिला 2017-18 चा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर पुरस्कार देण्यात आला नाही. कोरोनामुळे त्याची कार्यवाही होऊ शकली नाही. आता पुन्हा नव्याने कार्यवाही सुरू करण्यात आली खरी परंतु उमेदवार न मिळाल्याने तो पुरस्कार रद्द करावा लागला आहे.