शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर व Distance Education या लिंकवर अर्ज उपलब्ध
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील विविध अभ्यासक्रमांना नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्याकडून सलग पाच वर्षासाठी (सन 2022 ते 2027) मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली.
कुलगुरु डॉ. शिर्के म्हणाले, युजीसीकडून मान्यता मिळालेल्या अभ्यासक्रमांमध्ये बी. ए., बी. कॉम., एम. ए., भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम. ए. सामाजिकशास्त्र (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र) एम. कॉम. एम. एस्सी. (गणित) या पदवी व पदव्युत्तर विषयांचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हय़ातील 86 अभ्यास केंद्रामध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन आदी शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education या लिंकवर प्रवेशाबाबतची माहिती उपलब्ध असून http://sukapps.unishivaji.ac.in/studentregistration/#/ या ऑनलाईन लिंकवर प्रवेश घ्यावा. युजीसीने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी नियमित व दूरशिक्षण पद्धतीने पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण घेता येणार आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेवून एकाचवेळी दोन विषयांची पदवी प्राप्त करावी, असे आवाहन कुलगुरु डॉ. शिर्के यांनी केले. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील बारा अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव व दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. डी. के. मोरे आणि विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांचे सहकार्य लाभले, असे सांगायलाही कुलगुरु डॉ. शिर्के विसरले नाहीत.