प्रतिनिधी,कोल्हापूर
झाडे लावा झाडे जगवा अशा दरवर्षी फक्त घोषणा देणे सोपे आहे. पण प्रत्यक्षात झाड लावणे,त्याची जोपासना करणे हे जबाबदारीचे काम आहे.हे काम अधिक सोपे व्हावे यासाठी सिड बॉल्सचे मोफत वाटप अभिजीत परमाळे या तरुणाने सुरू केले आहे. कोइमतुर येथील पायोनियर अॅग्रोत केलेले दहा हजार सीडबॉल तो कोल्हापुरात मोफत वाटत आहे.ते जमिनीत टाकल्यानंतर जगतातच असे त्याचे वेगळेपण सांगितले जाते.त्यामुळे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाला या सीड बॉल्समुळे मोठा आधार मिळणार आहे.
या पावसाळ्याच्या हंगामात साधारण तीन हजार सीडबॉलचे वाटप केले जाणार आहे. हे सीड बॉल्स खुली जमीन,डोंगर ,टेकड्या,माळरान या ठिकाणी फेकले व त्यातले निम्म्याहून अधिक जगले तरी ते निसर्गाला पूरक ठरणार आहे अशी अभिजीत परमाळे यांची या उपक्रमामागील भूमिका आहे.
ते म्हणाले,झाडांच्या तयार रोपांची किंमत,त्याची ने आण,खुदाई हे व्यवहारात सर्वांना शक्य होत नाही. सिड बॉल्सची रचना अशी आहे की,ते छोट्या गोटी सारख्या आवरणाच्या आत बी आहे.प्राथमिक टप्प्यात उंदीर घूस किंवा इतर किड्यांनी कुरतडू नये यासाठी भोवती एक वेगळे आवरण आहे.त्यामुळे योग्य नियमित पाणी मिळाले की बी रुजते,अंकुर फुलतो. पहिल्यांदा घरातल्या कुंडीत हा सीड बॉल वाढवला व नंतर जमिनीत लावला तर तो अधिक चांगला फुलतो.
सध्या त्यांनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना
सीडबॉल देण्याची भूमिका घेतली आहे. आणि अन्य कोणीही मागितले तरी त्यांना पुरवण्याची त्यांची तयारी आहे. याची काळजी घ्या व त्यातील बियांनी एकदा मूळ धरले की,ती झाडे पुढे कित्येक पिढ्या आपली काळजी घेतील अशी त्यांची यामागील भावना आहे.
मोफत सिड बॉल्ससाठी संपर्क:
1) परमाळे सायकल्स.
2) बी.बी. परमाळे अॅन्ड सन्स.
3) परमाळे हेल्थ इक्विपमेंटस,
शिवाजी स्टेडियम समोर कोल्हापूर.
अभिजित परमाळे, 9890363636