सासष्टी, मुरगावात धक्कादायक प्रकार
मडगाव : सासष्टी व मुरगाव तालुक्मयातील शेकडो शिधापत्रिकाधारकांना सडलेल्या व बुरशी आलेल्या तांदळाचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिधापत्रिकेवर निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप केल्याने दोन्ही तालुक्मयांतील नागरिक संतप्त झाले आहेत. अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन तात्काळ तांदूळ बदलून द्यावा अशी मागणी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे. अनेकांना सडलेला आणि अळ्या झालेला तांदूळ मिळाला आहे. निकृष्ट धान्य मिळाल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. वितरीत करण्यात आलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे. दक्षिण गोव्यातील अनेकांना अशा प्रकारचा तांदूळ एप्रिल आणि मे महिन्यात देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिधापत्रिकाधारकांनी निकृष्ट दर्जाचा तांदूळ नाकरला असून, ताज्या तांदळाची मागणी केली आहे. हा तांदूळ गोदामातच सडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मडगाव, फातोर्डा आणि इतर भागातील तांदळाच्या साठ्यात लहान लहान किडे आणि भुंगे झाल्याचे आढळून आले आहे. अनेक स्वस्त धान्य दुकानात असलेले धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकांनी केला आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) आणि भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) यांच्यासमोर काही तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य हजारो लाभार्थ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे जुना कोटा वापरण्यास सांगण्यात आले होते. त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आलेला तब्बल 26 टन तांदूळ निकृष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून गोदामात पडून असल्याचा दावा दुकानदारांनी केलाय.