वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्नाटकाच्या दिव्या टी.एस.ने येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय नेमबाजी चाचणी स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल टी 6 मध्ये जेतेपद मिळविले.
दिव्याने अंतिम फेरीत हरियाणाच्या रिदम सांगवानचा 16-12 अशा फरकाने पराभव करीत सुवर्ण मिळविले. अनुराधा देवीने तिसरे स्थान मिळवित कांस्य मिळविले. मात्र रिदमने युवा व कनिष्ठ महिलांच्या एअर पिस्तुल टी 6 या प्रकारात सुवर्ण पटकावत दुहेरी मुकुट मिळविला. कनिष्ठ महिलांच्या अंतिम फेरीत रिदमने उत्तरप्रदेशच्या देवान्शी धामाचा 16-8 असा पराभव केला तर युवा विभागाच्या अंतिम फेरीत रिदमने उत्तरप्रदेशच्या मानसी आनंदचा 16-2 असा एकतर्फी धुव्वा उडविला.
महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल पात्रता फेरीत उत्तरप्रदेशच्या नेहाने 582 गुण नोंदवत अव्वल स्थान मिळविले तर दिव्वा व रिदम यांनी अनुक्रमे 576 व 575 गुण घेत दुसरे व तिसरे स्थान मिळविले. पात्रता फेरीत एकूण 283 खेळाडूंनी भाग घेतला होता. पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविलेल्या नेहाला अखेरीस पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कनिष्ठ विभागात मनू भाकरने जोरदार प्रयत्न केले. पण तिला तिसरे स्थान मिळाले.
पुरुषांच्या 25 मी. सेंटर फायर पिस्तुल नेमबाजीत प्रद्युम्न सिंगने पहिले स्थान मिळविताना 587 गुण नोंदवले. दुसरे स्थान मिळविणाऱया अंकुर गोयलने 583 व तिसरे स्थान मिळविणाऱया शिब कुमार घोषने 578 गुण नोंदवले.