वृत्तसंस्था/ पॅरीस
सर्बियाचा टॉप सिडेड पुरुष टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने एटीपीच्या मानांकन यादीत 377 आठवडे आपले अग्रस्थान कायम राखले असून त्याने जर्मनीची माजी महिला टेनिसपटू स्टेफी ग्राफच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे.
सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाच्या 35 वर्षीय जोकोविचने 7070 मानांकन गुणासह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. जोकोविचने एटीपीच्या मानांकनात सातव्यांदा अग्रस्थानावर पुन्हा झेप घेतली आहे. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जोकोविचने अजिंक्यपद मिळवून स्पेनच्या राफेल नदालच्या 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत स्पेनच्या कार्लोस अॅल कॅरेजने दुसरे स्थान मिळवले आहे.
डब्ल्यूटीए टूरवरील मानांकनात यापूर्वी जर्मनीची अव्वल महिला टेनिसपटू स्टेफी ग्राफने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 377 आठवडे अग्रस्थान कायम राखण्याचा विश्वविक्रम केला होता. आता जोकोविचने स्टेफी ग्राफच्या या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. अलीकडेच रशियाच्या मेदव्हेदेवने रोटरडॅम टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद तर स्पेनच्या अॅल कॅरेजने अर्जेंटिना खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोविच 7070 गुणासह पहिल्या, स्पेनचा कार्लोस अॅल कॅरेज 6480 गुणासह दुसऱ्या, ग्रीसचा स्टीफॅनोस सित्सिपेस 5940 गुणासह तिसऱ्या, नॉर्वेचा ख्रिस रुड 5515 गुणासह चौथ्या, रशियाचा आंद्रे रुबलेव 3860 गुणासह पाचव्या, स्पेनचा राफेल नदाल 3815 गुणासह सहाव्या, अमेरिकेचा टेलर फ्रिज 3660 गुणासह सातव्या, रशियाचा मेदव्हेदेव 3250 गुणासह आठव्या, कॅनडाचा फेलिक्स ऑगेर अॅलिसिमे 3200 गुणासह नवव्या आणि डेन्मार्कचा होल्गेर रुने 3161 गुणासह दहाव्या स्थानावर आहे