तळबीड पोलिसांची दमदार कामगिरी; कंटेनरसह सव्वा कोटीचा मुद्देमाल ताब्यात
प्रतिनिधी/ उंब्रज
यशवंतनगर (ता. कराड) गावच्या हद्दीत रात्रीच्या वेळी होणारी गुटखा वाहतूक रोखण्यात तळबीड पोलिसांना यश आले असून तब्बल 83 लाखांच्या गुटख्यासह सव्वा कोटीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी कंटेनर चालकासह दोघांना अटक केली आहे. कराड ते मसूर रस्त्यावर मंगळवारी 21 रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱया गुटख्याचा कंटेनर तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतला असून एक कोटी तेरा लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कंटेनरमध्ये 83 लाखांचा गुटखा मिळून आला आहे.
दरम्यान, परराज्यातून महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर गुटखा येतो. महामार्ग व चोरटय़ा मार्गाने होणाऱया गुटखा वाहतुकीवर आजवर अनेक कारवाया झाल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात तळबीड पोलिसांना यश आले आहे. गुटखा बंदीनंतर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई तळबीड पोलिसांकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांनी तळबीड पोलीस ठाण्यात धाव घेऊन अधिक चौकशी केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार 21 फेब्रुवारी दरम्यान रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान तळबीड पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात एक कंटेनर गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वरोटे यांनी पोलिसांचे पथक तयार करून मसूर रोडवर सापळा लावला. माहितीच्या आधारे संबंधित कंटेनरची पोलीस वाट पाहत असताना पहाटे 3.45 वाजता यशवंतनगर गावच्या हद्दीत कराडकडून कंटेनर येताना दिसला. थ्यांनी कंटेनर थांबवून व्यवस्थित चौकशी केली मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याची पोती मिळून आली. हा गुटखा परराज्यातील असून तब्बल 83 लाख 9 हजार 296 रुपये किमतीचा असल्याचे निष्पन्न झाले. गुटख्याची पोती अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी विकास सोनवणे व वंदना रुपनवर यांनी ताब्यात घेतली असून ती सातारा येथील गोडावूनला रवाना करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थामध्ये गुटखा विक्री व वाहतुकीस बंदी आहे. याप्रकरणी संशयित महंमद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले (रा. नरोना, ता. आलम, जि. गुलबर्गा, कर्नाटक) व मेहबूब बाबुमिया (रा. उडबल, ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करत आहेत. पोलीस पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, विभागीय पोलीस पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, तळबीड पोलीस ठाण्याचे फौजदार गोपीचंद बाकले, आप्पा ओंबासे, शहाजी पाटील, निलेश विभूते, महेश शिंदे व कर्मचाऱयांनी ही कारवाई केली.
कंटेनर चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे
पोलिसांनी शिताफीने कंटेनर थांबवून चालकास त्याचे नाव इतर माहिती विचारली असता त्याने मोहम्मद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले असे नाव सांगितले. गाडीत काय आहे अशी विचारणा केली असता त्याने गाडीमध्ये कोंबडी खाद्य असल्याचे सांगितले. पोलिसांनी कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याची पोती मिळून आली. हा गुटखा परराज्यातील असून तब्बल 83 लाख 9 हजार 296 रुपये किमतीचा असल्याचे निष्पन्न झाले.