शेल्टन, अॅल्कारेझ यांचे आव्हान उपांत्यफेरीत समाप्त, राजीव रॅम-सॅलीसबेरी दुहेरीत अजिंक्य
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे सुरू असलेल्या 2023 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा द्वितीय मानांकीत नोव्हॅक जोकोव्हिचने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा तर रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने स्पेनच्या टॉप सिडेड आणि विद्यमान विजेता कार्लोस अॅल्कारेझचा उपांत्यफेरीत पराभव करत अंतिमफेरीत स्थान मिळविले. रविवारी जोकोव्हिच आणि मेदव्हेदेव यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेत अमेरिकेचा राजीव रॅम आणि ब्रिटनचा जो सॅलीसबेरी यांनी सलग तिसऱ्यांदा पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविण्याचा नवा इतिहास घडविताना अंतिम सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा एब्डन यांचा पराभव केला.
या स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जोकोव्हिचने अमेरिकेच्या 20 वर्षीय बेन शेल्टनचा 6-3, 6-2, 7-6 (7-4) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. जोकोव्हिचने या स्पर्धेच्या इतिहासात विक्रमी दहाव्यांदा अंतिमफेरी गाठली असून त्याने अमेरिकेचा माजी टेनिसपटू बिल टिडेनच्या विक्रमाशी बरोबरी साधली. जोकोव्हिच आणि शेल्टन यांच्यातील हा उपांत्यफेरीचा सामना 2 तास 40 मिनिटे चालला होता. या स्पर्धेत 1992 साली अमेरिकेचा मायकेल चँग उपांत्यफेरी गाठणारा सर्वात तरुण टेनिसपटू ठरला होता. जोकोव्हिचचा हार्डकोर्टवरील स्पर्धेतील हा 100 वा सामना होता. जोकोव्हिचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत वर्षभरातील होणाऱ्या चार प्रमुख ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी तीन स्पर्धांमध्ये तिसऱ्यांदा अंतिमफेरी गाठली आहे. यापूर्वी त्याने असा पराक्रम 2010 आणि 2021 साली केला होता. जोकोव्हिच आता 24 व्या विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे वाटचाल केली आहे. 2023 च्या टेनिस हंगामात जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुली त्यानंतर फ्रेंच ग्रँडस्लॅम आणि आता अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने तो आगेकूच करीत आहे. जोकोव्हिचने या स्पर्धेत आतापर्यंत 17 वेळेला आपला सहभाग दर्शविला असून त्याने 10 वेळेला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जोकोव्हिचला चालू वर्षीच्या टेनिस हंगामात जुलैमध्ये झालेल्या विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्पेनच्या अॅल्कारेझने पराभूत करून आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकाविले होते.
या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने अॅल्कारेझचा 7-6 (7-3), 6-1, 3-6, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या पराभवामुळे अॅल्कारेझला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद राखता आले नाही. या स्पर्धेच्या इतिहासात स्वीसचा माजी टेनिसपटू रॉजर फेडररने सलग दोन वेळेला जेतेपद मिळविण्याचा विक्रम केला होता. 2008 नंतर या स्पर्धेत असा विक्रम कोणत्याही टेनिसपटूकडून नोंदविला गेला नाही. तृतीय मानांकीत मेदव्हेदेवने 2021 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकताना सर्बियाच्या जोकोव्हिचचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. उपांत्येफरीच्या सामन्यात मेदव्हेदेवने पहिले सलग दोन सेटस् जिंकल्यानंतर अॅल्कारेझने तिसरा सेट जिंकून सामन्यात रंगत आणली. पण चौथ्या सेटमध्ये मेदव्हेदेवने आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर अॅल्कारेझचे आव्हान संपुष्टात आणले.
पुरूष दुहेरीत अमेरिकेचा राजीव रॅम आणि ब्रिटनचा जो सॅलीसबेरी यांनी अंतिम सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांचा 2-6, 6-3, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव केला. रॅम आणि सॅलीसबेरी या जोडीने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेत पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद मिळविण्याचा नवा इतिहास केला. यापूर्वी असा पराक्रम अमेरिकेच्या टॉम बंडी आणि मॉरीस मॅक्लॉलीन यांनी 1912 ते 1914 या कालावधीत केला होता.