प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील लक्ष्मीदेवीचे मंदिर नवीन जागेत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या मंदिराशेजारी असलेली खुली जागा कमिटीने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून ती जमीन खरेदी करण्यासाठी राजश्री राजशेखर भेंडीगेरी यांनी 5 लाख 5 हजार 555 रुपये देणगी दिली. याबद्दल कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
लक्ष्मी मंदिरच्या ट्रस्ट कमिटीने नवीन जागेत मंदिर उभारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देणगीदारांनी देणगी देण्यास सुरुवात केली आहे. कै. पद्मावती कल्लाप्पा भेंडीगेरी यांच्या स्मरणार्थ राजश्री भेंडीगेरी यांनी ही देणगी दिली आहे. सत्कार कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि आरती प्रमोद पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
या मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. अत्याधुनिक अशा मंदिराची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून भक्तांनी त्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
या सत्कारप्रसंगी कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र गुंडप्पन्नावर, राजू भेंडीगेरी, अशोक भेंडीगेरी, संजय कडेमनी यांच्यासह इतर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार कृष्णा जठार यांनी मानले.