समिती उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून आणा : आमदार रोहित पवार यांचे सीमाबांधवांना आवाहन
वार्ताहर /किणये
सीमाप्रश्नाच्या लढाईसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. रक्त सांडले आहे. या हुतात्म्यांची एकच इच्छा होती की हा सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा. आता हुतात्म्यांचे स्वप्न तुम्ही सीमाबांधवांनी पूर्ण करायचे आहे. हुतात्म्यांचे स्मरण ठेवा. त्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका, सर्वांनी समितीच्या भगव्याखाली एकत्र या, असे आवाहन महाराष्ट्रातील युवा आमदार रोहित पवार यांनी हिंडलगा येथे सीमावासियांना केले. रविवारी सकाळी आमदार रोहित पवार यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले. आणि समितीच्या उमेदवारासाठी सर्वांनी खंबीरपणे प्रयत्न करा, असेही सांगितले. यावेळी उमेदवार आर. एम. चौगुले, मनोहर किणेकर, मदन बामणे आदी उपस्थित होते. त्यानंतर ते उचगाव येथे चौगुले यांच्या कोपरा सभेसाठी रवाना झाले.
उचगावात कोपरा सभा
रविवारी सकाळी आमदार रोहित पवार यांची उचगाव गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रारंभी कोपरा सभा घेण्यात आली. यावेळीही सीमाप्रश्नाच्या लढ्यासंदर्भात माहिती देऊन समितीच्या उमेदवाराला निवडून आणा, असे आवाहन पवार यांनी केले. आमदार रोहित पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी.. अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी मनोज पावशे, शिवाजी सुंठकर, अशोक हुक्केरीकर, बी. एस. होनगेकर, खंडेराव पावशे, सदानंद पावशे, मनोहर होनगेकर, लक्ष्मण होनगेकर, एल. वाय. लामगे, दीपक पावशे, माणिक होनगेकर, डॉ. प्रवीण देसाई, डॉ. मोहन पावशे, अरुण जाधव, गोंविद वाळके, निरा काकतकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.