स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू अब्दुल मुल्ला, रेहान नदाफ यांचा गौरव
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
माळमारुती येथील लव्हडेल सेंट्रल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर विद्याभारती कर्नाटक यांच्या मान्यतेने संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने दुहेरी मुकूट संपादन केला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अब्दुल मुल्ला, रेहान नदाफ यांना पुरस्कार देण्यात आला.
प्राथमिक गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने शांतिनिकेतन स्कूल खानापूर संघाचा 2-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. संत मीरातर्फे अब्दुल मुल्लाने 2 गोल केले.
माध्यमिक गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरने शांतिनिकेतन शाळेचा टायबेकरमध्ये 4-3 असा पराभव केला. स्वामी विवेकानंद स्कूलतर्फे प्रज्योत चव्हाण, विनायक नांदुरकर, विकास पाटील, अंकुश सडेकर, शांतीनिकेतनतर्फे अथर्व देसाई, गणेश पाखरे, निरंजन पाटील यांनी गोल केले. दुसऱया उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने देवेंद्र जीनगौडा शाळेचा 3-0 असा पराभव केला. संत मीराच्या रेहान नदाफने 2 गोल, आदित्य सानीने 1 गोल केला. अंतिम लढतीत संत मीरा शाळेने स्वामी विवेकानंद शाळेचा 2-0 असा पराभव केला, संत मीराच्या रेहान नदाफने 2 गोल केले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे संत मीरा शाळेच्या माजी मुख्याध्यापिका नीलिमा गाडगीळ, माधव पुणेकर, स्पोर्टिंग प्लॅनेटचे संचालक मतीन इनामदार, मानस नायक, सी. आर. पाटील, नीरज सावंत यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी क्रीडाशिक्षक ओमकार गावडे, प्रशांत वाडकर, मंजुळा हंपनन्नावर स्नेहलता ढबाले, बसवंत पाटील, स्वरा आजनकर, प्रियंका पाटील, साई बसरीकट्टी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून मानस नायक, योगेश सावगांवकर, ओमकार सावगांवकर यानी काम पाहिले.