कुंकळ्ळी : राष्ट्रीय महामार्गावर डोकमी, बाळ्ळी येथे बुधवारी सकाळी 6 च्या दरम्यान झालेल्या बस-स्कूटर अपघातात पीररवाडा-बेतूल येथील एकनाथ नाईक हा दुचाकीचालक ठार झाला. बेंगळूर-मडगाव अशा वाहतूक करणाऱ्या बसची स्कूटरला मागून धडक बसल्याने एकनाथ हा दुचाकीवरून फेकला गेला आणि त्याचे डोके दगडावर आपटल्याने जागीच त्याला मृत्यू आला, अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांकडून मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ नाईक हा आपला भाऊ मंगलदास नाईक याला डायलिसिस उपचार करण्यासाठी सकाळी बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात पोहोचवून नंतर बाळ्ळीच्या दिशेने जायला निघाला होता. रस्ता पार करताच मागून भरधाव आलेल्या बसची जोरदार धडक स्कूटरला बसली. त्यात एकनाथ स्कूटरवरून ऊसळून पडून बाजूच्या दगडावर त्याचे डोके आपटल्याने त्याला जागीच मृत्यू आला. मयत एकनाथ नाईक हा बेतूल पंचायतीचे माजी सरपंच मंगलदास नाईक यांचा थोरला भाऊ व माजी उपसरपंच आकांक्षा अनिल नाईक यांचा दीर होत. या घटनेचा कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल मंगेश सातोडकर यांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावातील जिल्हा इस्पितळात पाठविला. या प्रकरणी उपनिरीक्षक कविता रावत या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असून बसचालक दुर्गाप्पा भीनोप्पा कलगोंडा (हावेरी-कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एकनाथ नाईक याच्या पार्थिवावर आज गुरुवारी दुपारी 12 वा. पीरवाडा-बेतूल येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे.
Previous Articleशाहू छत्रपतींसोबत 228 नगरसेवक; 18 माजी महापौरांचा सहभाग : शाहू छत्रपतींना विजयी करण्याचा निर्धार
Next Article पत्रादेवी चेकपोस्टसमोर भीषण आपघात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.