प्रकल्पाचे सर्व बंधारे झाले रिकामी : खाण पीठांतील पाण्यावर भिस्त,पाऊस लांबल्यास येईल जलसंकट
फोंडा : राजधानी पणजीसह तिसवाडी व फोंडा या दोन तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ओपा पाणी प्रकल्पाच्या जलाशयातील पाण्याची पातळी बऱ्याच अंशी घटल्याने पुढील काही दिवसांत ‘पाणीबाणी’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा पाऊस अजून पंधरा दिवसांवर आहे. खांडेपार नदीवरील शेवटचे दोन बंधारेही उघडण्याची वेळ आली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून सध्या खाण पिठातील पाणी उपसण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
पाण्याची पातळी केवळ 2.89 मी.
ओपा पाणी प्रकल्पाची पातळी मंगळवारपर्यंत 2.89 मीटरवर पोहोचली होती. गेल्या वर्षी मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यापर्यंत हीच पातळी 4.25 मीटर एवढी समाधानकारक होती. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याची स्थिती समाधानकारक राहिल्याने पंपातून पाणी खेचण्याची प्रक्रियाही बंद करावी लागली होती. यंदा मात्र या उलट परिस्थिती आहे.
तेराही बंधारे पडले कोरडे
खांडेपार नदीवरील सर्व तेराही बंधाऱ्यातील पाणी उपसून पर्यायी सोय म्हणून खाण पिठातील पाणीही पंपाद्वारे खेचण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी खांडेपार नदीवरील शिंगणेव्हाळ व आंबे येथील शेवटच्या दोन बंधाऱ्यातील पाणी उपसण्याची तयारी सुरू होती.
कोडली खाणपीठातून खेचले पाणी
ओपा प्रकल्पाला पाणी सोडण्यासाठी सध्या कोडली येथील खाणपीठातून दर दिवशी 20 एमएलडी पाणी उपसले जात आहे. मागील आठवड्यापासून दोन पंप लावून पाणी खेचण्याचे काम सुरू होते. सध्या त्यात वाढ कऊन तीन पंपांद्वारे खाण पीठातील पाणी उपसावे लागत आहे. याशिवाय गांजे येथील म्हादई नदीतून 70 एमएलडी व काले नदीतून 30 एमएलडी पाण्याची वेगळी व्यवस्थाही केली जात आहे.
ओपातून दरदिवशी 153 एमएलडी पाणी पुरवठा
खांडेपार येथील ओपा पाणी प्रकल्पातून राजधानी पणजीसह संपूर्ण तिसवाडी व फोंडा या दोन तालुक्यांना तसेच धारबांदोडा तालुक्यातील काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. या तिन्ही तालुक्यांची पाण्याची गरज भागविण्यासाठी दरदिवशी 153 एमएलडी पाणी लागते.
सारी मदार आता खाणपीठाच्या पाण्यावर
ओपा प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी खांडेपार नदीवर 13 तर काले नदीवर 6 बंधारे आहेत. यंदा जून महिना सुरू होण्यापूर्वीच या सर्व बंधाऱ्यांतील पाणी उपसून शेवटचे दोन बंधारे शिल्लक राहिले आहेत. तेही एक दोन दिवसांत रिकामे होणार आहेत. सध्या पर्यायी सोय म्हणून कोडली, दाभाळ भागातील खाण पीठातील पाणी पंपांद्वारे उपसून खांडेपार नदीत सोडले जात आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांच्या प्रवाहात पाणी कमी राहिले. त्यामुळे यंदा पाण्याचे हे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याचा जलसंवर्धन खात्याचा अंदाज आहे. मान्सूनपूर्व पाऊस अनमोड घाटात सतत दोन तास कोसळल्यास नदीतील झरे प्रवाहीत होतील आणि परिणामी पाण्याची पातळी वाढण्याची आशा आहे. मात्र मान्सूनचा पाऊस लांबल्यास ओपा पाणी प्रकल्पामध्ये ‘पाणीबाणी’ स्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.