राजधानी पणजीसह सर्वत्र कोसळल्या सरी : आजही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता
पणजी : सोमवारी सायंकाळी उशिरा राज्यात सर्वत्र मध्यम तथा जोरदार पाऊस झाला. केपे भागाला मान्सूनपूर्व पावसाने अक्षरश: झोडपून काढले. केपे येथे जवळपास 5 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली तर जवळच्या सांगे येथे 1 इंच पेक्षाही जास्त पाऊस पडला. मडगावात देखील 1 इंच एवढा जोरदार पाऊस पडला. आजही राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. सोमवारी राज्यात रात्री उशिरा अनेक भागात जोरदार पाऊस पडला आणि उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला. वाळपईच्या भागात जोरदार पाऊस पडला मात्र तिथे केवळ 6 मि.मी. एवढीच नोंद झाली. फोंडा व पणजी येथे दीड मि.मी, सांखळी येथे 2.5 मि.मी., काणकोण येथे 4.2 मि.मी व दाबोळी येथे 1.5 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली.
सांगे, केपेत जोरदार पाऊस
सांगे, केपे या भागात मुसळधार पाऊस पडल्याने साळावली जलाशयात थोडेफार पाणी पोहोचले. या जलाशयात पाण्याची पातळी बरीच खाली गेलेली आहे. सोमवारच्या पावसामुळे पाण्याची पातळी फारशी वाढलेली नसली तरी वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस पात्र जास्त कोरडे होत आहे. अशावेळी जोरदार पाऊस पडणे म्हणजे पाण्याचे बाष्पीकरण थोडे कमी होणे व जलाशयात थोडेफार अतिरिक्त पाणी पोहोचणे असा प्रकार आहे.
पणजीतही मध्यम पाऊस
पणजीत पहाटेच्या दरम्यान सुमारे 20 मिनिटे मध्यम प्रमाणात पाऊस पडला. पणजीत जोरदार पाऊस पडल्याशिवाय महापालिका व सा.बां.खात्याला पाणी नेमके कुठे तुंबले जाईल व कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत याचा अंदाज मिळणे कठीण आहे. पणजीत पहाटे मध्यम तथा हलक्या स्वऊपाच्या पावसाच्या धारा पडून गेल्या.
आजही पावसाची शक्यता
हवामान खात्याने आजही गोव्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली. त्याचबरोबर आज व पुढील दोन दिवस जोरदार वारे वाहण्याचा इशारा दिलेला आहे. त्याच्याबरोबर खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 55 कि.मी. पर्यंत जाऊ शकतो.