यरमाळ रोड परिसरातील घटना : आग विझवून टाळले नुकसान
बेळगाव : यरमाळ रोड परिसरात रस्त्या शेजारील गवताला व कचऱ्याला आग लावण्यात आल्याने परिसरात ठेवण्यात आलेल्या ड्रेनेज वाहिन्यांना आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. ही बाब परिसरात फिरावयास आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आल्याने आग विझविण्याचा प्रयत्न करून होणारे नुकसान टाळले. वडगाव यरमाळ रोडवर, बाळकृष्ण नगर परिसरात ड्रेनेज वाहिन्या घालण्यात येत आहेत. याकरिता मोठ्या आकाराच्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या या परिसरात ठेवण्यात आल्या आहेत. जलवाहिन्या ठेवण्यात आलेल्या ठिकाणी गवत आणि कचऱ्याला आग लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. रात्रीच्यावेळी फिरावयास गेलेले बाळकृष्णनगर येथील रहिवासी कृष्णा के. उटवाले आणि पाटील गल्ली येथील उमेश पाटील यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी झाडाच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण ही आग आटोक्यात आली नाही. त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पाईप जळण्याचा धोका होता. काही पाईप दोघानी मिळून बाजूला हटविण्याचा प्रयत्न केला. पण पाईपचा साठा जास्त असल्याने कमी वेळेत हटविणे अशक्य होते. त्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला संपर्क साधून तक्रार केली. लागलीच या ठिकाणी पाण्याचे बंब दाखल झाल्यानंतर या परिसरात लागलेली आग विझविण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ड्रेनेज वाहिन्याचे नुकसान टळले. जर कृष्णा उटवाले आणि उमेश पाटील यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आग विझविल्याने पाईप जळण्यापासून बचावल्या. अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.