एका खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर
बेळगाव : येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर येळ्ळूरच्या जनतेवरच गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी होती. यामधील दोन खटल्यांमधील चौघा साक्षीदारांना समन्स बजावण्यात आला आहे. तर एका खटल्याची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. येळ्ळूरच्या जनतेवर गुन्हा दाखल केल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयात सुरू आहे. मात्र विविध कारणांनी ही सुनावणी पुन्हा पुन्हा पुढे ढकलत आहे. शुक्रवारी 794/15, 167/15, 122/15 या खटल्यांची सुनावणी होती. दोन खटल्यांमध्ये साक्षीदार हजर झाले नाहीत. तर एका खटल्याची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. 794 आणि 167 या खटल्यांची सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. तर 122 क्रमांकाच्या खटल्याची सुनावणी 31 मार्च रोजी होणार आहे. या खटल्यांमध्ये येळ्ळूरच्या जनतेच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.