पुणे / वार्ताहर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (1 मे) पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत तात्पुरते बदल विविध भागात करण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यभागात मोदी यांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्यामुळे अनेक गजबजलेले महत्त्वाचे रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. मध्यभागात शाळा, तसेच व्यापारी पेठ आहे. शाळा बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने निर्णय न घेतल्याने पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सोमवारी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. मोदींच्या दौऱ्यानिमित्त शहरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन मंगळवारी सकाळी पुणे शहरात होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळी अकरा वाजता मोदी दर्शन घेऊन अर्ध्या तासात पूजा, अभिषेक करणार आहेत. त्यानंतर पावणे बरा वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितासाठी आहे. त्यानंतर शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदानावर विविध विकासकामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात येणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यानंतर कृषी महाविद्यालय येथे अर्धा तास त्यांनी आरक्षित ठेवला असून, विविध लोकांच्या ते भेटीगाठी घेतील.
मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यभागातील वाहतूक बदल करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी सहा ते दुपारी तीन यावेळेत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक बदल करण्यात आलेले रस्ते पुढीलप्रमाणे :
आचार्य आनंदऋषीजी चौक (पुणे विद्यापीठ चौक), वेधशाळा चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, शिवाजी रस्ता, बुधवार चौक, सेवासदन चौक, टिळक चौक (अलका चित्रपटगृह), टिळक रस्ता, जेधे चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, संगमवाडी रस्ता, येरवडा सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रस्ता.