दोन हजार वर्षांपासून पृथ्वीनजीक अस्तित्वात
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
पृथ्वीला आणखी एक चंद्र मिळाल्याचा खुलासा नव्या अध्ययनात झाला आहे. हा चंद्र क्वासी-मून म्हणजेच अर्ध-चंद्र आहे. क्वासी मून एक स्पेस रॉक (एस्टेरॉयड) असतो, जो पृथ्वी आणि सूर्य दोघांनाही प्रदक्षिणा घालत असतो, परंतु सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असतो. हवाई येथील पॅन-एसटीएआरआरएस दुर्बिणीच्या मदतीने 2023 एफडब्ल्यू 13 नावाचा क्वासी मून शोधण्यात आला आहे. हा क्वासी मून 2100 वर्षांपासून पृथ्वीनजीक अस्तित्वात होता आणि आता याची ओळख पटली आहे. हा क्वासी मून पुढील 1500 वर्षांपर्यंत पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहणार आहे. त्यानंतर हा क्वासी मून पृथ्वीची कक्षा सोडून देणार आहे, यामुळे पृथ्वीला कुठलाच धोका नसेल. 2023 एफडब्ल्यू 13 हा सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांचाच कालावधी घेतो. क्वासी-मूनला क्वासी-सॅटेलाइट देखील म्हटले जाते. चंद्राप्रमाणेच ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असल्याचे त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटते. परंतु क्वासी-मून पृथ्वीऐवजी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात असतात. याचमुळे त्यांना क्वासी म्हटले गेले आहे. 2023 एफडब्ल्यू 13 ला पहिल्यांदा 28 मार्च रोजी पॅन-एसटीएआरआरएस दुर्बिणीतून पाहिले गेले होते. आता याच्या अस्तित्वाची पुष्टी झाली आहे. इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल युनियनच्या माइनर प्लॅनेट सेंटरमध्ये याची नोंद करण्यात आली आहे. 2023 एफडब्ल्यू 13 आकाराने किती मोठा आहे याची माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु याचा व्यास 30-5 फुटांचा असू शकतो असे वैज्ञानिक रिचर्ड बिनजेल यांनी म्हटले आहे.