सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचे उद्गार : महिला नूतन विद्यालयात गौरव सोहळा
प्रतिनिधी /फातोर्डा
मडगाव शहरात शालेय विद्यार्थ्यांची कोंडी होते हे लक्षात घेऊन दवर्ली-दिकरपाली येथे कुजिराच्या धर्तीवर शैक्षणिक संकुल लवकरात लवकर उभे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी समाज सेवा संघाच्या महिला नूतन इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले. सदर हायस्कूलच्या शालान्त परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आणि निवृत्त शिक्षक व कर्मचाऱयांचा सत्कार यावेळी आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून डॉ. शेषाद्री च्यारी, संस्थेचे अध्यक्ष सुदिन नायक, मुख्याध्यापिका रिचा कामत, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण परब उपस्थित होते. सुदिन नायक यांनी स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यातून वैज्ञानिक तयार व्हावेत यासाठी स्कूलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व रोबोटिक्स केंद्र सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी डॉ. शेषाद्री च्यारी यांची मदत घेतली जाणार आहे.
पुढे बोलताना नायक यांनी सांगितले की, यासाठी स्कूलमध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येईल. त्यासाठी आयआयटीचे शिक्षण घेतलेल्या प्रसाद रांगणेकर यांचे मार्गदर्शन घेतले जाईल. यासाठी 50 लाख रुपये खर्च येणार आहे, असे त्यांनी सांगितले. गोव्यातील हे अशा प्रकारचे पहिलेच केंद्र असेल आणि त्यात 5 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी काही कंपन्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शालान्त परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच निवृत्त शिक्षक व कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या शाळेत शिक्षण घेतलेल्या व आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या भक्ती कुलकर्णी, डॉ. सर्वेश कोसंबे, ऍड. राधा नाईक यांचा सत्कार करण्यात आला. रिचा कामत यांनी अहवाल सादर केला.